कामगारांचा पीएफ, जीएसटी, विम्याचे पैसे नातेवाईकांच्या खात्यावर वळविले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीच्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याने विश्वास संपादन करून कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार स्वतःच्या ताब्यात घेतले. या विश्वासाचा गैरफायदा घेत, त्याने कंपनी सोडून गेलेल्या कामगारांना कामावर दाखवून, कामगारांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) आणि जीएसटीमध्ये पैसे न भरता, ते पैसे नातेवाईकांच्या खात्यात वळविल्याचे उघड झाले आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे कंपनीला तब्बल दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागले.
या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी संदेश संजय तरटे (रा. प्रणिती हाइट्स, आव्हाळवाडी) याला अटक केली आहे. ही घटना चंदननगर येथील राघवेंद्रनगरमधील सायन व्हिजिलंट कंपनीत १ एप्रिल २०१६ ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत घडली.
याप्रकरणी सुप्रिया अविनाश संकपाळ (वय ३७, रा. अंजनी अपार्टमेंट, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर न्यायालयाने संदेश तरटे याला १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुप्रिया संकपाळ यांची “सायन व्हिजिलंट सर्व्हिसेस” ही सुरक्षा रक्षक पुरविणारी कंपनी आहे. संदेश तरटे या कंपनीत अॅडमिनपदावर कार्यरत होता. त्याच्याकडे कामगारांचे पगार, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, आणि जीएसटीचे सर्व आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी होती.
कंपनीने भविष्यातील आर्थिक व्यवहारांचे ऑडिट केल्यावर, संदेश तरटे याने कामगारांच्या पगाराचे खोटे रेकॉर्ड तयार करून, ते पैसे स्वतःच्या व नातेवाईकांच्या खात्यात वळविल्याचे उघड झाले. कंपनीने पाठविलेल्या चलनांची आणि ई-मेलची तपासणी केली असता, त्याने कामगारांच्या खात्याचे डेटा डिलीट केल्याचेही समोर आले.
संदेश तरटे याने १३ लाख ३१ हजार ११२ रुपये नातेवाईकांच्या खात्यात वळवले. तसेच, त्याने कंपनीच्या चालू खात्यातून वडील, भाऊ, काका, काकू आणि आईच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. २०१५ ते २०२० या कालावधीत त्याने कंपनीच्या विश्वासाला तडा देत तब्बल दोन कोटींची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
