५ येमेनी पुरुष, २ महिला व्हिसा संपल्यावरही रहात होते पुण्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत ५ येमेनी पुरुष आणि २ येमेनी महिला पासपोर्ट व्हिसाची मुदत संपल्यानंतरही पुण्यात राहात असल्याचे आढळले. त्यांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ५३ परदेशी नागरिकांना २०२४ मध्ये त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले होते.
पुणे शहरामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी मोहिम विशेष शाखेच्या परकीय नागरिक नोंदणी विभागामार्फत राबवली जात आहे. या कारवाई अंतर्गत कोंढवा परिसरातील एनआयबीएम उंड्री रोडवरील मोनार्च रेजेन्सी या सोसायटीत ५ येमेनी पुरुष आणि २ येमेनी महिला बेकायदेशीरपणे व्हिसाची मुदत संपल्यानंतरही राहत असल्याचे आढळले.
त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कागदपत्रांची परकीय नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ) विशेष शाखेकडून चौकशी करून त्यांना लिव्ह इंडिया नोटीस देण्यात आली असून, त्यांच्या मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार शहरामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना लिव्ह इंडिया नोटीस देऊन डिपोर्ट करण्याची कारवाई पुणे शहरात व्यापक स्तरावर सुरू केली आहे.