आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रियकराने प्रेयसीच्या पतीची दुचाकी पेट्रोल टाकून जाळली

Spread the love

पुणे : एकेकाळची प्रेयसी लग्न झाल्यानंतर तिच्या संसारात रमली होती. तरीही प्रियकर तिला भेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. तिने भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या पतीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत शेजारील दुसऱ्या दुचाकीलाही आग लागली. ही घटना रामटेकडी येथे गुरुवारी पहाटे ५ वाजता घडली. वानवडी पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे. अहमद पठाण (वय ४०, रा. रामटेकडी) असे या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद पठाण याच्याबरोबर एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर तिने पठाण याला नकार देत प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर तिचा दुसऱ्या तरुणासोबत विवाह झाला. असे असतानाही अहमद पठाण तिला भेटण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होता. तिने त्याला वारंवार नकार दिला.

बुधवारी ती आपल्या पतीसह एका लग्नाला गेली होती. तिच्या मागोमाग अहमद पठाणही लग्नस्थळी गेला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने त्याला भेटण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून त्याचा तिच्या पतीसोबत भर लग्नसमारंभात वाद झाला.

या घटनेमुळे चिडलेल्या पठाणने गुरुवारी पहाटे ५ वाजता तिच्या घरी जाऊन तिच्या पतीची दुचाकी बाहेर आणली आणि तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत शेजारील दुसऱ्या दुचाकीलाही आग लागून तिचे टायर जळून खाक झाले.

या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अदमाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अहमद पठाण याला ताब्यात घेतले.