आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ब्लॅक मॅजिकच्या नावाखाली वृद्धेला २९ लाखांचा गंडा

Spread the love

पुणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका वृद्ध महिलेला मुलीतील दोष दूर करण्याच्या बहाण्याने दोन व्यक्तींनी तब्बल २८ लाख ८८ हजार ७२२ रुपयांचा गंडा घातला. लंगर घालणे, पूजा करणे आणि ब्लॅक मॅजिक करण्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असल्याचे सांगून हा प्रकार घडला.

बालेवाडी येथील ६२ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २३ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आरोपींशी फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीच्या आधारे त्यांनी फिर्यादीच्या मुलीमध्ये काही दोष असल्याचा दावा केला. दोष दूर करण्यासाठी विशेष पूजा, लंगर घालणे तसेच जादुटोणा (ब्लॅक मॅजिक) करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला.

त्यांनी वेळोवेळी पूजा व उपचारांसाठी पैसे पाठवण्याची विनंती केली. फिर्यादी महिलेने त्यांच्या सूचनेनुसार एकूण २८ लाख ८८ हजार ७२२ रुपये पाठविले. मात्र, मुलीच्या आरोग्यात किंवा दोषामध्ये कोणताही सुधार दिसला नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण करीत आहेत.