चाकूचा धाक दाखवून ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद
१० ट्रॅक्टर, १ छकडा, २ ट्रेलर जप्त, बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : पहाटेच्यावेळी ट्रॅक्टर चालकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणार्या चार जणांच्या टोळीला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १० ट्रॅक्टर, १ छकडा, २ ट्रेलर व मोबाईल असा ५५ लाख ६५ हजारांचा माल जप्त केला आहे.
जिग्नेश अंजाबापूर आडागळे (वय १९, रा. टाकरखन ता. माजलगाव जि. बीड), विजय राजू साळवे (वय २४, रा. शेलगाव थडी ता. माजलगाव जि. बीड), धिरज बाळू कारके (वय २४, रा. पाथरवाला ता. अंबड जि. जालना), प्रदिप उर्फ भगत भगवान तौर (वय २२, रा. शेलगाव थडी ता. माजलगाव जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सचिन कृष्णा नवले (वय २९, रा. कांदलगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना इंद्रेश्वर साखर कारखान्याजवळील आडबाजूला १३ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडला होता.
फिर्यादी हे ट्रॅक्टर घेऊन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय दोरीने बांधून तोडाला मफलर बांधून आडरानात टाकून दिले. त्यांच्याजवळील ट्रॅक्टर, छकडा ट्रॉली व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला.
या गुन्ह्यात तपास करताना पोलीस उप निरीक्षक वळसने व त्यांच्या सहकारी अंमलदारांनी गोपनीय माहिती काढून तिघांना अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. फिर्यादीचा चोरलेला ट्रॅक्टर, छकडा ट्रॉली व मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
विजय साळवे आणि धीरज कारके यांनी प्रदिप तौर याच्या सांगण्यावरुन केल्याचे सांगितले. दोन वर्षांपूर्वी टेंभूर्णी परिसरातून ट्रॅक्टर व दोन ट्रेलर चोरल्याचे तपासात उघड झाले. प्रदिप तौर याचा माजलगाव येथे शोध घेऊन अटक केली.
माजलगावमध्ये किशोर शिंपले (रा. आंबेवडगाव, ता. धारुर, जि. बीड) याने चोरीचे ट्रॅक्टर विकल्याचे तपासात सांगितले. या गुन्ह्यात पोलिसांनी १० ट्रॅक्टर, १ छकडा, २ ट्रेलर, १ मोबाईल असा एकूण ५५ लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
त्यातील चार गुन्हे उघडकीस आले असून इतर ६ ट्रॅक्टरच्या मालकांचा शोध सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व सहाययक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सुरवसे, पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरूळे, राहुल बोंदर, सागर वाकळे, सुभाष उत्तरेश्वर, राहूल जाधव, आकाश कांबळे, युवराज गायकवाड, नागनाथ आंधळे, रतन जाधव यांनी केली आहे.
