आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अ‍ॅक्वागार्ड ग्राहकांच्या घरी जाऊन गंडा

Spread the love

कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्‍याचे कृत्य : कोरेगाव पार्कमधील तीन ग्राहकांची फसवणूक

पुणे : युरेका फोर्बस कंपनीतून आल्याचे सांगून ग्राहकांच्या घरी जाऊन कंपनीचा टेक्निशियन असल्याचे भासवून नवीन प्लॅन देण्याच्या नावाखाली कोरेगाव पार्क येथील तीन ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा गंडा कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्‍याने घातला आहे.

गणेश विठ्ठल लंगोटे (रा. गणेशनगर, येरवडा) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत युरेका फोर्बसच्या जनरल काऊन्सिल आनंदिया मजुमदार (वय ४३, रा. रावेत) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ जूनपासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युरेका फोर्बस कंपनी अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायरची विक्री करते. एका वर्षापर्यंत विनामूल्य सर्व्हिसिंग दिले जाते. त्यानंतर ग्राहकांना सेवा सुरू ठेवण्यासाठी अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट (AMC) करावे लागते. कंपनीने यासाठी टेक्निशियन नेमले आहेत.

गणेश लंगोटे हा कंपनीत सर्व्हिस टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. आठ महिने नोकरी केल्यानंतर त्याने ती सोडली. बोट क्लब परिसरातील एका महिलेने पाच वर्षांपूर्वी अ‍ॅक्वागार्ड घेतले होते. २४ जून २०२४ रोजी गणेश लंगोटे त्यांच्या घरी गेला.

त्याने महिलेला सांगितले की, “तुमचे अ‍ॅक्वागार्ड सुपर कंपनीच्या सर्व्हिसिंगचे अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट संपले आहे. तुम्हाला रिचार्ज करावे लागेल.” त्याने महिलेसमोर विविध प्लॅन सादर केले. महिलेला विश्वास बसल्याने तिने ५,३३२ रुपयांचा ‘गोल्ड प्लॅन’ निवडला आणि गणेश लंगोटेच्या मोबाईलवर पैसे पाठवले.

यानंतर त्याने अ‍ॅक्वागार्ड मशीनचे फिल्टर बदलले. मात्र, तो निघू लागला तेव्हा महिलांनी पेमेंटच्या पुष्टीकरणाबाबत विचारले. त्यावर “तुम्हाला ई-मेलद्वारे कन्फर्मेशन मिळेल,” असे सांगून तो निघून गेला. पुढील दोन दिवस त्याने महिलांच्या फोन कॉल्स उचलले नाहीत, त्यामुळे त्यांना संशय आला.

महिलांनी कंपनीशी संपर्क साधल्यावर कंपनीकडून सांगण्यात आले की, “गणेश लंगोटे याला कामावरून काढून टाकले आहे. तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल करा.” गणेश लंगोटेने अशाच प्रकारे कोरेगाव पार्कमधील आणखी दोन ग्राहकांना फसवले असून, एकूण १८,०३२ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळ्ळुरे करत आहेत.