विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १२ वर्षांनी खटल्याचा निकाल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. या प्रकरणात पतीसह सासू-सासऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरामपल्ली यांनी हा निकाल दिला.
शिक्षा सुनावलेल्यांची नावे संतोष पवार, विठ्ठल पवार आणि मंगल पवार (सर्व रा. १५ नंबर, मनीष सुपर मार्केटच्या मागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर) अशी आहेत. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव सविता पवार असे आहे.
ही घटना २५ मे २०१३ रोजी हडपसरमधील लक्ष्मी कॉलनी येथे घडली. सविता आणि संतोष यांचा विवाह ३० नोव्हेंबर २०१२ रोजी झाला होता. लग्नात दिलेल्या हुंड्यात काही वस्तू, जसे की भांडी, दोन तोळे सोने, कुलर, फ्रीज आणि पीठाची गिरणी, अपुरी असल्याचे सांगत माहेरहून आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. या सततच्या छळाला कंटाळून सविता पवार यांनी २५ मे २०१३ रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एम. पवार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी साक्षीदार तपासले. न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कोर्ट पैरवी अधिकारी श्रीशैल तेलुनगी आणि सहायक फौजदार अविनाश गोसावी यांनी सहाय्य केले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी श्रीशैल तेलुनगी, पोलीस हवालदार अविनाश गोसावी आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. एम. पवार यांना १० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
