भारतातील AI क्रांतीची नवी सुरुवात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात अमेरिकेचं वर्चस्व आहे. मात्र, चीनमधील लहानसं स्टार्टअप डीपसीकने ओपनएआय आणि जेमिनी यांसारख्या मोठ्या AI मॉडेल्सना आव्हान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारनं मोठी घोषणा केली आहे. भारत लवकरच स्वतःचं मोठं AI मॉडेल विकसित करणार असून, ते येत्या दहा महिन्यांत उपलब्ध होईल.
माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “भारत स्वतःच्या मोठ्या लँग्वेज मॉडेलवर (LLM) काम करत आहे. या मॉडेलमध्ये भारतीय संदर्भ आणि संस्कृतीचा समावेश असेल. आम्ही त्यासाठी आवश्यक फ्रेमवर्क तयार केलं असून, लवकरच ते लॉन्च केलं जाणार आहे.”
AI मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी अत्याधुनिक GPU (Graphics Processing Unit) आवश्यक असतात. याबाबत माहिती देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “डीपसीक AI ला २,००० GPU ने, तर चॅटजीपीटीला २५,००० GPU ने ट्रेन करण्यात आलंय.
भारताकडे सध्या १५,००० हाय-एंड GPU आहेत, तसेच आम्ही १८,००० GPU क्षमतेची AI कम्प्युटिंग सुविधा विकसित केली आहे. ही सुविधा लवकरच स्टार्टअप्स, संशोधक आणि डेव्हलपर्ससाठी उपलब्ध करून दिली जाईल.”
भारत सरकार इंडिया AI मिशन अंतर्गत तंत्रज्ञानाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्येही AI चा वापर करण्यावर भर देणार आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य, शिक्षण, शेती आणि हवामान यांसारख्या क्षेत्रांत AI तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग केला जाईल.
गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये केंद्र सरकारने इंडिया AI मोहिमेला मंजुरी दिली होती. १०,००० कोटी रुपयांच्या या योजनेअंतर्गत भारतात AI कम्प्युटिंग इकोसिस्टम विकसित केली जात आहे. तसेच, AI स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहेत.
भारताच्या स्वदेशी AI मॉडेलमुळे देशाला जागतिक AI स्पर्धेत स्वतःचं स्थान निर्माण करता येईल. सरकारच्या या उपक्रमामुळे भारतीय संशोधक, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे.
