महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ: बार्शी उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्यावरील कॅनॉलवरील सात पूल आणि उर्वरित कॅनॉलच्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आमदार सोपल म्हणाले की, अपक्षांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या युती सरकारच्या काळात भीमा-सीना जोड कालवा आणि त्यानंतर बार्शी उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आली. 2014 मध्ये रिधोरे येथील पंपगृहातून समारंभपूर्वक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर नियमानुसार सातत्याने पाणीपुरवठा केला जात आहे.
कॅनॉलमधील पाणी आता जामगाव येथून रायझिंग मेनद्वारे तावडी तलावात सोडले जात आहे. तसेच ढाळे-पिंपळगाव मध्यम प्रकल्पासाठी पाणी सोडण्याचे उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यांवरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कालवा मार्गावरील सर्व तलाव भरून घेतले जात असून, भविष्यातही हा प्रक्रिया नियमित होईल, असेही आमदार सोपल यांनी सांगितले.
या वेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी कवठेकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे गळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट डमरे, बाजार समिती संचालक मुन्ना डमरे, नागेश अक्कलकोटे, भास्कर काशीद, घाडगे गात आदी मान्यवर उपस्थित होते.
