२५ लाख ५१ हजारांचे मॅफेड्रॉन व गांजा जप्त; तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव-वाघोली रोडवरील संतनगर, बिबवेवाडी येथील आनंदनगर आणि विमाननगर येथे गेल्या दोन दिवसांत अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २५ लाख ५१ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे सहकारी विमानतळ परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी लोहगाव-वाघोली रोडवरील संतनगर येथे कारवाई करत कुमेल महम्मद तांबोळी (वय २८, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १९ लाख १७ हजार ३०० रुपयांचा ८३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आला.
त्यानंतर पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळालेल्या माहितीवरून मार्केटयार्ड येथील आनंदनगर, बिबवेवाडी रोडवर सैफन ऊर्फ शफिक इस्माईल शेख (वय ५२, रा. आनंदनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून ७ हजार रुपयांचा ३५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत पोलीस अंमलदार संदीप शिर्के यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विमाननगर चौकाकडून श्रीकृष्ण हॉटेल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, मारुती सुझुकी शोरूमसमोर पोलिसांनी कारवाई केली. यात किरण भाऊसाहेब तुजारे (वय २४, रा. श्री बिल्डिंग, आव्हाळवाडी, वाघोली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून ६ लाख २७ हजार रुपयांचा ३० ग्रॅम ३५ मिलीग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन जप्त करण्यात आला.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे आणि राजेंद्र मुळीक यांनी केले.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे आणि पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदीप शिर्के, अझिम शेख, साहिल शेख, रवींद्र रोकडे, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, आझाद पाटील, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, रेहाना शेख, दयानंद तेलंगे पाटील, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे, योगेश मोहिते, प्रवीण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, नूतन वारे आणि विपुल गायकवाड यांनी ही कारवाई यशस्वी केली.
