सूर्यदत्त ग्रुपतर्फे ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२५’ प्रदान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि त्यांचे विचार तरुणांना यशाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी त्यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. संग्राम इंदोरे यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रशांत पितळीया, प्रा. डॉ. मनीषा कुंभार, राजीव श्रीवास्तव, संजय मणियार यांसह संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. संग्राम इंदोरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले २५० हून अधिक गडकोट अभ्यासताना त्यांच्या नेतृत्वशैलीची, स्थापत्यकलेतील प्रगाढ ज्ञानाची आणि स्वराज्यावरील निष्ठेची ओळख झाली. ‘गडकोट किल्ले आणि मी’ या पुस्तकाची निर्मिती याच अभ्यासातून झाली.
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनही दुर्ग अभ्यासामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. महाराजांनी माणसे जोडून स्वराज्य उभे केले, तर स्वामी विवेकानंद यांनी ओजस्वी विचारांतून माणसे घडवली.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी डॉ. इंदोरे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “गडकोट अभ्यास, वाइल्डलाइफ फोटोग्राफी आणि दुर्गम भागातील वैद्यकीय सेवा यांसारख्या क्षेत्रांत त्यांचे योगदान मोठे आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तीला सन्मानित करताना सूर्यदत्त संस्थेस समाधान वाटते.”
कार्यक्रमात प्रशांत पितळीया यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा धायगुडे आणि चिन्मय सूळ यांनी सूत्रसंचालन केले.