पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा संशय : पोलीस तपास सुरू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी येथील संविधान चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर भरदुपारी गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली.
गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव पवन सुभाष गवळी (वय २८) असे आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता संविधान चौकातील वीरबाजी पासलकर कमानीजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन गवळी याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे.
सोमवारी तो संविधान चौकातील कमानीजवळ उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात पवनच्या कमरेला गोळी लागली.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तातडीने पवन गवळी याला ससून रुग्णालयात दाखल केले, आणि सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बिबवेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.