पवन गवळी जखमी : बिबवेवाडी पोलिसांनी माधव वाघाटे टोळीतील तिघांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत गुन्हेगार माधव वाघाटे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी पवन गवळी याच्यावर सोमवारी भर दुपारी गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी माधव वाघाटे यांच्या टोळीतील तिघांना अटक केली आहे.
याबाबत पवन सतिश गवळी (वय २८, रा. बिबवेवाडी ओटा स्कीम, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी शंकर जाधव (वय २३, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी), सलमान ऊर्फ सल्या हमीद शेख (वय २५, रा. अप्पर बिबवेवाडी) आणि हर्षल संतोष चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
माधव वाघाटे यांच्या खुनानंतर सनी जाधव हा टोळीप्रमुख झाला आहे. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, लोकांवर हल्ले करणे, घातक शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याला १८ मार्च २०१९ पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीनंतरही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबत नसल्याने त्याला एमपीडीए अंतर्गत २९ डिसेंबर २०२० रोजी एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरू राहिल्याने त्याच्यावर नोव्हेंबर २०२३ मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
सलमान शेख याच्यावर दोन खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे, आर्म्स ॲक्ट, बेकायदा जमाव जमविणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, दोघांकडूनही पोलिसांनी हमीपत्र घेतले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार माधव वाघाटे (वय २८) याच्यावर ८ ते १० जणांनी हल्ला करून निर्घृण खून केला होता. ही घटना १५ मे २०२१ रोजी घडली होती. व्हॉट्सॲप स्टेटसवरून झालेल्या वादातून हा खून झाला होता.
या खुनानंतर माधव वाघाटे यांच्या पार्थिवाची धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यात जवळपास १२५ बाईक सहभागी झाल्या होत्या. या बाईक रॅलीमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पुणे पोलीस सतर्क झाले. त्यांनी बाईक रॅलीत सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करून अटकेचे सत्र सुरू केले. तसेच, मोठ्या संख्येने बाईकही जप्त करण्यात आल्या.
माधव वाघाटे यांच्या खून प्रकरणात पवन सतीश गवळी (वय २८, रा. बिबवेवाडी ओटा स्कीम, बिबवेवाडी) याच्यासह बिबवेवाडी पोलिसांनी जवळपास १० जणांना अटक केली होती. पवन गवळी सध्या बॅड व्यवसाय करतात. सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता एका ऑर्डरनंतर ते घरी चालले होते.
यावेळी संविधान चौकाकडून व्हीआयटी कॉलेजकडे जात असताना संविधान चौकाजवळ एका गल्लीतून चार जण आले. त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तुल तर उर्वरित दोघांच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी पवन गवळी यांना तलवारीचा धाक दाखवून थांबवले.
त्याच्याजवळ येऊन, “थांब, तुला खल्लास करतो,” असे म्हणत पाठीमागून गोळी झाडली. ती पवन यांच्या कमरेला लागली. त्यानंतर ते पळून गेले. जखमी अवस्थेत पवन गवळी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या पवन गवळी यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य ५ ते ७ जणांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत.