एडव्हेंचर जंक्शनने सर केली भैरवगडाची फ्रंट वॉल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सह्याद्रीच्या खोर्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीचा भैरवगड (फ्रंट वॉल) पुण्यातील एडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर करून भगव्या ध्वजासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
माळशेज घाट उतरल्यावर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावाच्या दक्षिणेस भैरवगडाची अजस्त्र भिंत दिसते. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत अशा भिंतींना डाईक असे संबोधले जाते. पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या या भिंतीची उंची सुमारे ४५० फूट आहे. ही अजस्त्र भिंतच भैरवगड म्हणून ओळखली जाते.
या किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या कातळ भिंतीवर क्लाइम्बिंग रूट आहे. हा चढाई मार्ग सर करण्यासाठी आवश्यक सर्व उपकरणांसह टीम शनिवारी मोरोशी गावात दाखल झाली. रात्री ट्रेक करून किल्ल्याजवळ तंबू लावून मुक्काम करण्यात आला. पहाटे मानसिंग चव्हाण यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर कृष्णा मरगळे आणि लोकेश नाईलकर यांनी लीड क्लाइम्ब करत चढाई सुरू केली.
या दोघांनी सुरुवातीचे पहिले दोन स्टेशन, म्हणजे तब्बल ३०० फूट, ९० अंशातील प्रस्तरारोहण, अवघ्या एका तासात पूर्ण केले. त्यानंतर मानसिंग चव्हाण आणि अनंता कोकरे यांनी चढाई सुरू केली. तिसऱ्या स्टेशननंतर ट्रॅव्हर्स मारल्यानंतर सरळ उभी क्रॅक (भेग) पार करावी लागते.
क्रॅकजवळ बोल्ट लांब असल्याने लोकेश नाईलकर यांनी फ्रेंड्स, चोक नट्स यासारख्या अत्याधुनिक उपकरणांचा योग्य वापर करून हा टप्पा पूर्ण केला. पाचव्या स्टेशननंतर ६०-७० फूट निसरड्या दगड-मातीच्या ८० अंशातील मुक्त चढाईचा जोखमीचा टप्पा अनुभवी कृष्णा मरगळे यांनी पार केला आणि टीमने सायंकाळी ६ वाजता शिखर गाठले.
शंकर मरगळे यांनी मोहिमेस संपूर्ण तांत्रिक (टेक्निकल) सहकार्य दिले. या चढाई मार्गात ओव्हरहँग, ओपन बुक, स्क्री (निसरडी दगडमाती), क्रक्स (अवघड भाग), फ्री क्लाइम्ब (मुक्त चढाई) अशी विविध आव्हाने आहेत.
अत्याधुनिक उपकरणांचा योग्य वापर आणि रूट पाहण्यासाठी ड्रोनच्या मदतीने मोहिम यशस्वीपणे पार पडली. गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक व पूर्वेला हरिश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो.
पूर्वी पारंपरिक रिंग बोल्ट वापरून क्लाइम्बिंग केले जात होते. मात्र, ते रिंग बोल्ट कालांतराने गंजून जुने झाल्याने चढाई मार्ग धोकादायक झाला होता. २०१२ साली सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह (SCI) या संस्थेने त्याच चढाई मार्गावर कठीण पातळी कायम ठेवत नवीन गंजरोधक बोल्ट बसवले. त्यामुळे हा चढाई मार्ग आता सुरक्षित झाला आहे.
