ज्येष्ठ शास्त्रज्ञ, साहित्यिक, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार, ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, अभिनेते सचिन पिळगावकर, अवकाशशास्त्रज्ञ प्रा. डॉ. नरेंद्र भंडारी, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक सीए डॉ. अशोककुमार पगारिया, उद्योग क्षेत्रातील अग्रणी दिलबाग सिंग बीर, वैद्यकीय सामाजिक सेवा क्षेत्रातील डॉ. सदानंद राऊत, तसेच नामांकित उद्योजक मयूर व्होरा आणि मयूर शहा यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
पर्यावरण अभ्यासक पद्मश्री चैत्राम पवार, सुप्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा आणि स्मिता जयकर, क्रस्ना डायग्नोस्टिकचे राजेंद्र मुथा, जागतिक व्यापार तज्ज्ञ सागर चोरडिया, इस्रायलचे भारतातील कौन्सुल जनरल कोब्बी शोषणी, ऍड. शेखर जगताप, सहकार तज्ज्ञ डॉ. शिवाजीराव डोले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश पारसनीस, प्रेरक वक्ते राहुल कपूर जैन, उद्योगपती इंद्रनील चितळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर खाबिया, तसेच कृषी उद्योजक सुनील वाघमोडे यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.
स्टार्टअप आणि उद्योजकता क्षेत्रातील योगदानासाठी जैनम आणि जीविका जैन यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय यंग अचिव्हर्स पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. हा सन्मान सोहळा ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता बंतारा भवन, मुंबई-पुणे महामार्ग, बाणेर, पुणे येथे संपन्न होणार आहे.
या वेळी अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर प्रमुख उपस्थित असतील.
याशिवाय, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, तसेच विशेष उपस्थिती म्हणून सिस्टर लुसी कुरियन आणि लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे यांची उपस्थिती लाभणार आहे.
