सराईत गुन्हेगारांनी अवलंबले वेगळीच टेक्निक : मुंढव्यातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ग्राइंडर सोशल नेटवर्किंगवरुन मैत्री करुन तरुणाला आडबाजूला बोलावून त्याला लुटणार्या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.
करण ऊर्फ कॅरी (बापू) विशाल लाचारकर (वय २३, रा. ताडीवाला रोड) आणि मनिष बबन निंबाळकर (वय २१, रा. गोपाळपट्टी, मांजरी, मुळ रा. राळेगण म्हसोबा, ता. जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. करण लाचारकर याच्यावर यापूर्वी वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
या वाहन चोराने ग्राइंडर या तृतीयपंथीच्या सोशल नेटवर्किग साईटचा वापर करुन त्यांच्या जाळयात आलेल्या तरुणाला आड बाजूला बोलावून लुटण्याचा प्रकार सुरु केला होता. एका तरुणाची ग्राइंडर या तृतीयपंथींच्या सोशल नेटवर्किंग अॅप्लीकेशनवर बापू नावाच्या व्यक्तीबरोबर ओळख झाली होती. त्याने या तरुणाला तुला भेटायचे आहे, असे सांगून मगरपट्टा येथे बोलवून घेतले.
त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून लक्ष्मी लॉन्सचे समोरील मोकळ्या जागेत रात्री घेऊन गेला. तेथे त्याचा एक साथीदार अगोदरच येऊन थांबला होता. दोघांनी मिळून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेऊन दोघे पळून गेले होते.
२३ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली होती. बदनामी होईल, म्हणून या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याने तक्रार दिली. यातील आरोपी बापूबाबत पोलीस हवालदार विनोद साळुंके यांना माहिती मिळाली.
त्याआधारे पोलिसांनी करण लाचारकर याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून मनिष निंबाळकर याला पकडण्यात आले. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी २४ तासाच्या आत दोघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल धोत्रे, राजू कदम, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, योगेश राऊत यांनी केली आहे.
