खोट्या सह्या करून स्वतःच्या खात्यात घेतले पैसे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करत असताना धनादेशावर खोट्या सह्या करून एका महिला अधिकाऱ्याने तब्बल १४ लाख ३१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सौजन्य सूर्यकांत निकम (वय ३३, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अनुश्री आनंद सावंत (वय ४३, रा. सहकारनगर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सदाशिव पेठेतील केदार असोसिएट्स येथे फेब्रुवारी २०१९ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुश्री सावंत या केदार असोसिएट्स येथे अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करत होत्या. त्यांच्याकडे सर्व अकाउंट रेकॉर्ड्स सांभाळण्याची जबाबदारी होती. केदार असोसिएट्स हे प्रामुख्याने एसआरएच्या योजना राबवतात. या काळात सावंत यांनी धनादेशाद्वारे एसआरए योजनेसाठी पैसे दिल्याचे दाखवले.
मात्र, प्रत्यक्षात अधिकृत स्वाक्षरीकर्त्याच्या नावे खोट्या सह्या करून पदाचा गैरवापर करत १४ लाख ३१ हजार २७२ रुपये स्वतःच्या खात्यात वळते करून फसवणूक केली. एसआरए योजनेसाठी पैसे मिळाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर करत आहेत.
