आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिला सरपंचाचा पती व सरपंच लाच प्रकरणात जाळ्यात

Spread the love

पुणे : आरक्षणामुळे महिलांना सरपंच पद भूषवावे लागते, परंतु प्रत्यक्ष कारभार त्यांच्या पतींनी सांभाळल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात एका महिला सरपंचाच्या पतीने लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये गिवशी आंबेगावचा सरपंच देखील लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी अडकला आहे.

वेल्हा तालुक्यातील वरघड गावाच्या महिला सरपंचाचे पती नथुराम कोंडिबा डोईफोडे (वय 32, रा. रायकर मळा, धायरी) व गिवशी आंबेगावचे सरपंच बाळासाहेब धावू मरगळे (वय 33, रा. किरकटवाडी, हवेली) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एका 40 वर्षीय तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार दिली होती.

तक्रारदाराने वेल्हा तालुक्यातील वरघड गावात जमीन खरेदी केली होती. या जमिनीवरील पूर्वीच्या मालकाच्या नावाच्या गाव नमुना ८अ उतार्‍यावरून नाव कमी करून नवीन मालकाचे नाव टाकण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला. यासाठी महिला सरपंच सुवर्णा डोईफोडे व त्यांच्या पती नथुराम डोईफोडे यांनी 18 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार मिळाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले. सिंहगड रोडवरील नांदेड सिटी गेटसमोरील अतुल्य हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पार्किंगमध्ये 16 हजार रुपये स्वीकारताना नथुराम डोईफोडे यांना रंगेहाथ पकडले.

गिवशी आंबेगावचे सरपंच बाळासाहेब मरगळे यांनी लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रेम वाघमारे तपास करीत आहेत.