मोबाईलचे पहिले पाच क्रमांक टाकल्यावर खाते रिकामे : सायबर चोरट्यांचा नवा फंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुगलवरून झिप्टो अॅपचा कस्टमर केअर नंबर शोधणे एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १ लाख ८८ हजार ४७० रुपयांना महागात पडले. मोबाईलचे पहिले पाच क्रमांक टाकल्यानंतर सायबर चोरट्यांनी खाते रिकामे केले. या प्रकरणी कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीने झेप्टो अॅपवरून घरगुती सामानाची ऑर्डर दिली होती. सामानामध्ये डाळ, तांदूळ, चहा पावडर, साबुदाणा यांचा समावेश होता. मात्र, साबुदाणा बारीक आल्याने त्यांनी तो परत करण्याचा प्रयत्न केला.
यासाठी त्यांनी गुगलवर झेप्टोच्या कस्टमर सपोर्टचा नंबर शोधून लिंकवर क्लिक केले. ऑर्डर रिलेटेड क्वेरीवर क्लिक केल्यावर त्यांना एका नंबरवरून “hi” असा मेसेज आला. त्यानंतर त्याच नंबरवरून फोन आला व समोरच्या व्यक्तीने ऑर्डर तपासण्यासाठी दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ कॉल केला.
त्यानंतर त्यांना पे टी एम अॅपवर पैसे रिफंड करण्याचा बहाणा करत मोबाईलचे पहिले पाच क्रमांक टाकण्यास सांगितले. फिर्यादी यांनी “९४२३५” असे क्रमांक टाकले. काही वेळात त्यांच्या खात्यातून ९४ हजार २३५ रुपये डेबिट झाल्याचे त्यांना लक्षात आले.
फोनवरच त्याने पैसे कसे कट झाले याबाबत विचारणा केली असता समोरच्या व्यक्तीने बँकेच्या दुसऱ्या अकाऊंटला क्रेडिट होऊन डेबिट झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर ओव्हर ड्राफ्ट अकाऊंटवरून देखील ९४ हजार २३५ रुपये कट झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्या मोबाईलमध्ये “Rust Desk” नावाचे अॅप देखील डाऊनलोड झाले होते. आपल्याबरोबर सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेत जाऊन सर्व खाती फ्रिज केली. मात्र, तोपर्यंत १ लाख ८८ हजार ४७० रुपयांची फसवणूक झाली होती.
बारीक साबुदाणा बदलण्यासाठी गुगलवर झिप्टो अॅपच्या लिंकवर क्लिक करणे ज्येष्ठ नागरिकांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल माने करत आहेत.
