हडपसर पोलिसांनी तिघांना पकडून केली सुटका
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तरुण तरुणीच्या प्रेमसंबंधांना तरुणीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. या कारणामुळे तरुणाने प्रेयसीला पळवून नेल्याने चिडलेल्या तिच्या नातेवाईकांनी तरुणाच्या वडिलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आणि अपहरण झालेल्या वडिलांची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलाचे वाघोली येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. ३ फेब्रुवारी रोजी मुलगी गायब झाल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यासाठी हडपसरमधील तरुणाच्या घरी धाव घेतली. त्या वेळी तरुणही घरी नसल्याने दोन्ही बाजूंमध्ये वादावादी झाली.
यानंतर काही वेळात मुलीचा भाऊ आणि इतर तिघेजण पुन्हा फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीच्या पतीला जबरदस्तीने घराबाहेर ओढून दुचाकीवरून त्यांचे अपहरण केले. या घटनेनंतर फिर्यादी महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन कुदळे व महेश कवळे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली. वाघोली, केसनंद, वाडे बोल्हाई परिसरात आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याची माहिती मिळाली.
यानंतर आरोपी बार्शी, सोलापूर भागात जात असल्याचे समजले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व तपास पथकाने पाटस टोलनाका येथे पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या तरुणाच्या वडिलांची सुटका करण्यात आली. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. अपहरणासाठी वापरलेल्या दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र सलगर आणि पोलीस अंमलदार संदीप राठोड, अजित मदने, कुंडलीक केसकर, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अमोल जाधव यांनी केली आहे.
