आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मंदिरासाठी ग्रेनाइट दगड विकत घेण्यासाठी दिलेल्या १८ लाखांचा अपहार

Spread the love

पुणे : भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या नवीन मंदिरासाठी ग्रेनाइट दगड उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या १८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नई येथील दोन व्यक्तींवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टला संस्थापक प्रभाकर सरदेशमुख महाराज यांच्या समाधीस्थळावर नवीन मंदिराचे बांधकाम करायचे होते. या कामासाठी महाबलीपुरम येथील गायत्री स्कल्पर्सचे आर. कृष्णमूर्ती यांना स्थापत्याचे काम देण्यात आले होते.

मंदिराचे काम हे कोरीव व घडीव असल्याने चांगल्या दर्जाचे ग्रेनाइट दगड खरेदीसाठी २०१५ ते २०१६ दरम्यान १८ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यात आले होते. मात्र, कोरोना काळात काम ठप्प झाल्यामुळे कृष्णमूर्ती यांनी अ‍ॅडव्हान्सची रक्कम खर्च झाल्याचे सांगितले.

२०२१ साली चेन्नईचे रमेश पळणी अप्पन हे आश्रमात आले होते. त्यांनी फिर्यादी सुश्रृत सरदेशमुख यांचा विश्वास संपादन करून मंदिरासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आर. कृष्णमूर्ती यांना दिलेली रक्कम स्वतःकडे घेऊन आणखी भर टाकून देणगी देण्याचे सांगितले.

२७ मे ते २० ऑक्टोबर २०२२ दरम्यान आर. कृष्णमूर्ती यांनी टप्प्याटप्प्याने १८ लाख रुपये रमेश यांच्याकडे जमा केले. मात्र, रमेश यांनी ती रक्कम परत केली नाही किंवा देणगीही दिली नाही.
फिर्यादी यांनी विचारणा केल्यानंतर रमेश यांनी ती रक्कम साईचरणकडे जमा केली असल्याचे सांगितले.

साईचरण बाहेरगावी असल्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेरीस सरदेशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी चेन्नईचे रमेश पळणी अप्पन आणि साईचरण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.