सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे ; शायनिंग मारण्यासाठी कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अटक झालेल्या तरुणाचे नाव ऋतिक संजय ननावरे (वय २४, रा. विजयश्री अपार्टमेंट, बालाजीनगर) असे आहे. सोमवारी सहकारनगर पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना बालाजीनगर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली.
माहितीनुसार, पवार हॉस्पिटलच्या मागील बजरंग दल चौकाजवळ अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर एक तरुण कोणाची तरी वाट पाहत होता. त्याच्या कमरेला पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने खातरजमा करून सापळा रचला आणि ऋतिक ननावरे याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्या पँटमध्ये खोचलेले गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी ६३ हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीत ऋतिकने “गंमत म्हणून पिस्टल घेतले” असे सांगितले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत आणि खंडू शिंदे यांनी सहभाग घेतला.
