खडकवासला अभियंत्यांचा बनावट आदेश : सराईत गुन्हेगार सचिन जांभुळकरवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकामासंदर्भात फ्लेक्स उभारून नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये, यासाठी गैरसमज पसरविण्यात आला. पर्यावरण वाचवण्यासाठी वनीकरण करण्यासाठी परवानगी मिळाल्याबाबत पाटबंधारे विभागाचा बनावट आदेश तयार करण्यात आला. तसेच बांधकाम पूर्णत्वास न्यायचे असेल, तर ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. वानवडी पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी जयप्रकाश जगन्नाथ गिरमे (वय ६७, रा. वत्सला भवन, प्रभात रोड) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सचिन सोमनाथ जांभुळकर (वय ४६, रा. भैरोबानाला, सोलापूर रोड, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वानवडी येथे वडिलोपार्जित मालकीची जमीन आहे. गिरमेबाग येथील या जमिनीवर विकसनाचे काम सुरू आहे. सचिन जांभुळकर याने जून २०२४ पासून सातत्याने बांधकामाच्या साईटबाबत जनमानसात गैरसमज निर्माण करणारी काल्पनिक माहिती प्रसारित करण्यास सुरुवात केली.
त्याने फ्लेक्सचे बोर्ड लावून बांधकाम सुरू असलेल्या जागेबाबत खोटी माहिती पसरवली. तसेच लोकांनी सदर बांधकामातील सदनिका खरेदी करू नयेत, म्हणून त्या जागेच्या मालकीबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांचे व्यवसायिक नुकसान करण्याच्या उद्देशाने, शेजारील जमिनीला वनीकरणासाठी परवानगी मिळाल्याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा बनावट आदेश तयार करण्यात आला. हा बनावट आदेश बांधकाम साईटवरील लायझनिंग मॅनेजर मंगेश भोसले यांना पाठवून मिळकतीवर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तसेच “बांधकाम पूर्ण करायचे असेल, तर मला ५० लाख रुपये द्या, अन्यथा तुमचे बांधकाम पूर्ण होऊ देणार नाही”, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आली. सचिन जांभुळकर याने त्याच्या मोबाईलवर भारताचे बोधचिन्ह (राजमुद्रा) आणि “Member C, Ministry of Telecommunication, Government of India, New Delhi” असा मजकूर DP/Status म्हणून ठेवला होता.
यापूर्वीही सचिन जांभुळकरवर फसवणुकीचे दोन गुन्हे वानवडी पोलीस ठाण्यात २०१३ आणि २०१५ मध्ये दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने अधिक तपास करत आहेत.
