सामाजिक उपक्रम व आरोग्य जनजागृतीला उत्तम प्रतिसाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील चिखलसे गावी विशेष हिवाळी शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ५० स्वयंसेवकांनी या शिबिरात सक्रीय सहभाग नोंदविला. शिबिराच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे, चिखलसे गावाचे सरपंच सचिन काजळे, उपसरपंच संतोष शेंडगे आणि ग्रामसेवक परमेश्वर घोमसाळे उपस्थित होते.
शिबिरादरम्यान ग्रामविकास सर्वेक्षण, साथीचे आजार आणि रक्तक्षय (अनिमिया) यावर प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. याशिवाय ग्रामस्वच्छता अभियान व वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, किशोरवयीन आरोग्य व शारीरिक स्वच्छता, योगाचे फायदे आणि सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर या विषयांचा समावेश होता.
जलस्रोत स्वच्छता व जलप्रदूषण जनजागृती तसेच माजी विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेची भावना जपण्याचा संदेश दिला. या संपूर्ण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. आशिष चिंबाळकर, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. पवनकुमार वानखडे, प्रा. कल्याणी सहारे आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
