आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा जेरबंद

Spread the love

पुणे : पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.

राजू महादेव डेंगळे (वय २२, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० जानेवारी रोजी पहाटे सुमारे पावणेसहा वाजता संबंधित महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या.

त्या त्रिमूर्ती चौकाजवळील प्रज्ञा वॉशिंग सेंटरसमोरून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाला आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

तपास पथकातील अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राजू डेंगळे याने केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कात्रज-कोंढवा रोडवर त्याला अटक केली.

त्याच्याकडून चोरीस गेलेली एक तोळ्याची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. तसेच, त्याने अन्य कुठले गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, गुन्हे निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सागर बोरगे यांचा समावेश होता.