फरासखाना पोलिसांनी सहा जणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी येथे वाहनांची तोडफोड झाल्यानंतर येरवडा आणि फरासखाना येथे गुरुवारी पहाटे अशाच प्रकारच्या घटना घडल्या. चार दिवसांपूर्वी एका गुन्हेगाराला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी टोळक्याने त्याच्या गाडीसह एक रिक्षा आणि चार दुचाकींची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
यासीन इम्तीयाज शेख (वय २९, रा. कागदीपुरा, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मयुर गणेश अडागळे (वय १८, रा. पीएमसी कॉलनी, कसबा पेठ), मंथन प्रकाश सकट (वय १९, रा. पीएमसी कॉलनी), आयान अख्तर शेख (वय २०, रा. ओम), देविदास शिंदे (वय २०, रा. मंगळवार पेठ), आर्यन संदीप वाघमारे (वय २०, रा. पीएमसी कॉलनी, कसबा पेठ) आणि साहील कुरेशी (वय २१) यांना अटक केली आहे.
मयुर अडागळे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गर्दी जमवून दहशत माजविणे आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आयान शेख याच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा नोंद आहे. साहील कुरेशी याच्याविरुद्ध पळवून नेणे, पोक्सो, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याच्या तयारीचे गुन्हे फरासखाना, समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यासीन शेख हे रिक्षाचालक आहेत. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास, तीन मोटारसायकलवरून आरोपी आले आणि त्यांनी त्यांच्या रिक्षेसह पाच दुचाकींची तोडफोड केली.
यासाठी त्यांनी कोयते आणि दगडांचा वापर केला. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सराईत गुन्हेगार मयुर अडागळे याला ताब्यात घेतले. अडागळे याने चौकशीदरम्यान सांगितले की, चार दिवसांपूर्वी आयान शेख याला कसबा पेठेतील पीएमसी बिल्डिंगसमोर जाहीद ताजुद्दीन कुरेशी आणि इतरांनी वाद घालून मारहाण केली होती.
याची पोलिसांत तक्रार न करता त्यांनी स्वतःच बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरोपींनी तीन मोटारसायकलवरून येऊन, हातातील कोयते आणि दगडांच्या सहाय्याने गाड्यांची तोडफोड केली.
तोडफोडीत फिर्यादीची रिक्षा, जमील कुरेशी यांची यामाहा मोटारसायकल, ताजुद्दीन कुरेशी यांची जावा मोटारसायकल, इम्रान कुरेशी आणि अकीब कुरेशी यांच्या दुचाकींचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.
