व्यावसायिकाची २६.९८ लाखांची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उसने पैसे परत करून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर बनावट प्रतिज्ञापत्राच्या आधारे तब्बल २८ हजार लिटर डिझेल घेऊन २६ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी आनंद लाहोटी (वय ४१, रा. श्रीराम चौक, वानवडी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुण बायरेड्डी (रा. नानाई बाग, वानवडी) व त्यांच्या भागीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार १ जुलै ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत हॉटेल ग्रँडन, चंदननगर येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लाहोटी यांचा सय्यदनगर येथे ‘मगर फ्युएल स्टेशन’ नावाचा पेट्रोल पंप आहे.
ते डोअर-टू-डोअर डिझेल विक्रीही करतात. अरुण बायरेड्डी यांनी इव्हेंट मॅनेजमेंट आणि हॉटेल व्यवसाय करीत असल्याचे सांगून सुरुवातीला होळी सणानिमित्त ४ लाख रुपये उसने घेतले आणि नंतर ते पैसे परत केले.
त्यानंतर हॉटेल व्यवसायासाठी पुन्हा ४ लाख रुपये घेतले आणि काही कालावधीनंतर तेही परत केले. मे २०२४ मध्ये बायरेड्डी यांनी फिर्यादी आणि सरबजितसिंग बग्गा यांना ‘हॉटेल ग्रँड नवमी’ येथे जेवणासाठी बोलावले.
त्यावेळी त्यांनी “मी कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला आहे, तुम्ही त्यात गुंतवणूक करा,” अशी ऑफर दिली. मात्र, फिर्यादींनी ती नाकारली. यानंतर बायरेड्डी यांनी “माझ्या व्यवसायासाठी महिन्याला २५ ते ३० हजार लिटर डिझेल लागते, तुम्ही एक महिना उधारीवर डिझेल द्या” असे सांगितले.
त्यासाठी प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले आणि १ जुलै २०२४ पासून डिझेल पुरवठा सुरू करण्यात आला. महिनाभरात २६ लाख ९८ हजार ५१५ रुपयांचे २८ हजार लिटर डिझेल पुरवण्यात आले.
डिझेलपुरवठ्यानंतर बायरेड्डी यांनी बिल देण्यास टाळाटाळ सुरू केली. ऑगस्टमध्ये फिर्यादींनी डिझेलपुरवठा थांबवून थकीत बिलाची मागणी केली असता, बायरेड्डी यांनी आज-उद्याचा हवाला देत वेळ काढली.
त्यांनी सुरक्षेसाठी दिलेला धनादेश बँकेत भरला असता तो बाऊन्स झाला. त्यानंतर उर्वरित दोन धनादेशांची तपासणी केली असता, त्यावरची सही आणि प्रतिज्ञापत्रावरील सही वेगळी असल्याचे लक्षात आले.
म्हणजेच, बनावट सही करून बनावट प्रतिज्ञापत्राच्या आधारे डिझेल घेतल्याचे उघड झाले. फिर्यादींच्या तक्रारीनंतर चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आश्विनी पाटील करत आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून २८ हजार लिटर डिझेल घेऊन व्यावसायिकाची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
