महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी: शिक्षणामुळे स्वतःमधील सर्वोत्तम क्षमतांचे सादरीकरण करता येते. विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्ये आणि क्षमता असतात. त्यांना योग्य दिशा देऊन आत्मविश्वास वाढवण्याचे काम चाटे शिक्षण समूह करत आहे. त्यामुळे हजारो यशस्वी विद्यार्थी आणि समाधानी पालकांचा विश्वास चाटे पॅटर्नवर वाढत आहे.
“यश पर्व” या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलताना चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव राऊत यांनी योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम घेतल्यास निश्चितच उज्वल यश मिळते, असे प्रतिपादन केले. तसेच, दहावीनंतरच्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि त्यांची गरज स्पष्ट करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चाटे शिक्षण समूह, बार्शीचे शाखा व्यवस्थापक प्रा. पांडुरंग घाडगे म्हणाले, “स्पर्धा हा विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या स्पर्धेत विद्यार्थी टिकावा आणि यशस्वी व्हावा यासाठी चाटे पॅटर्न सर्वतोपरी प्रयत्न करत असून त्यात अपेक्षित यश मिळत आहे.”
पालक प्रतिनिधी सचिन वायकुळे आणि किरण डुबे यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत चाटे पॅटर्नमुळे सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वेगाने होत असून मुलांना यशस्वी होताना पाहणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. बार्शीमध्ये चाटे शिक्षण समूह हे स्वप्न साकार करत असल्याचा आनंद आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात वेदांत डुबे, सेजल सावळे, अक्षरा श्रीश्रीमाळ, वेदांत वायकुळे आणि श्रेयश मुंडे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून चाटे शिक्षण समूहाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “हा पॅटर्न केवळ शालेय परीक्षांसाठी मर्यादित नसून होमी भाभा, एम.टी.एस.ई., एन.टी.एस.ई., स्कॉलरशिप यांसारख्या विविध परीक्षांसाठी उपयुक्त ठरत आहे,” असे त्यांनी सांगितले.
याच वेळी चाटे टॅलेंट सर्च आणि भास्कराचार्य टॅलेंट सर्च परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले, तसेच ६ लाख ७० हजार रुपयांच्या स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मा. महेश परिट, नंदा एखंडे, आरती जोशी, शिंदे, बालाजी माने, निलेश बोधले, राजाभाऊ गाडेकर, संदीप वायचळ यांसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा लुंगारे आणि पूजा कोरफळकर यांनी केले, तर आभार स्वाती लोखंडे यांनी मानले.
