पुणे गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखा, युनिट-०४ पुणे शहर यांनी अवघ्या ०४ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
दिनांक ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६:०० ते ०६:३० च्या दरम्यान महेश तुपे (वय ५६, रा. पाषाण, पुणे) हे दूध आणण्यासाठी गेले असता, कोकाटे आळी येथील गणपती मंदिराजवळ त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात इसमाने गंभीर जखमी करून त्यांचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-०४ च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात जागेच्या वादातून आरोपी ओम निम्हण आणि दोन साथीदारांनी संगणमत करून धारदार शस्त्राने हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस हवालदार अजय गायकवाड आणि हरीश मोरे यांना गुप्त माहिती मिळाली की, खुनातील मुख्य आरोपी ओम बाळासाहेब निम्हण (वय १९, रा. पाषाण, पुणे) हा विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे, पेरूच्या बागेजवळ लपून बसला आहे.
त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की, त्याने व दोन साथीदारांनी मिळून धारदार शस्त्राने महेश तुपे यांचा खून केला. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा, युनिट-०४ च्या पथकाने केलेल्या या जलद तपासामुळे अवघ्या ०४ तासांत आरोपीला अटक करणे शक्य झाले. पुढील कारवाईसाठी आरोपीला चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस हवालदार अजय गायकवाड, हरीश मोरे, विशाल गाडे, विनोद महाजन, एकनाथ जोशी, प्रविण भालचव्ही, वैभव रणपिसे, रोहिणी पांडुरकर आणि मयुरी नलावडे यांनी केली.
