आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अपघाताचा बहाणा करून कारचालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

पुणे : सॅलसबरी पार्क येथे अपघाताचा बहाणा करून कारचालकाला धमकी देत गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित कांबळे (वय २१, रा. औद्योगिक वसाहत, व्हेईकल डेपो) आणि सागर जळकुटे (वय २४, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) अशी आहेत.
या प्रकरणी ३१ वर्षीय व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

फिर्यादी ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या कार्यालयातून कारने घरी जात असताना मुकुंदनगरहून डायस प्लॉट चौक येथे आले. त्याचवेळी एका दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला मागून धडक दिली.

अपघातानंतर वादावादी झाली, मात्र फिर्यादी घरी जाण्यासाठी पुढे निघाले. सॅलसबरी पार्क येथील श्री सुविधा दर्शन बंगल्याजवळ आरोपींनी पुन्हा त्यांची गाडी अडवली. तेव्हा त्यांनी फिर्यादीस धमकावले, “अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे.

नुकसानभरपाई द्या, अन्यथा तुम्हाला ठार मारू.” त्यानंतर मारहाण करत दहशत निर्माण केली. लोक मदतीसाठी पुढे आले असता, “आमच्या नादाला लागाल, तर जिवंत सोडणार नाही” असे म्हणून त्यांनाही धमकावले.

फिर्यादींनी “माझ्याजवळ पैसे नाहीत” असे सांगितले असता, एकाने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावली आणि दोघे दुचाकीवरून पळून गेले. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सुजय पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी डायस प्लॉट येथे थांबले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, दोघे पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची सोनसाखळी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली, ज्याची एकूण किंमत १ लाख रुपये आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानावडे, रवींद्र कस्पटे, पोलीस अंमलदार नितीन वाघेला, सुजय पवार, संदीप घुले, दीपक खेदाड, फिरोज शेख, शैलेश वाघमोडे आणि हनुमंत दुधे यांनी पार पाडली.