आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मालमत्तेसाठी काकाचा खुन करणाऱ्या पुतण्यांना अटक

Spread the love

पुणे : मालमत्तेच्या कारणावरून रस्त्यात काकाचा निर्घुण खुन करणाऱ्या पुतण्यांसह तिघांना पोलिसांनी चार तासांत जेरबंद केले.

अटक केलेल्या आरोपींची नावे शुभम महेंद्र तुपे (वय २८, रा. निम्हण, विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण, रोहन सूर्यवंशी (वय २०, रा. पाषाणगाव), ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. विठ्ठल मंदिराजवळ, पाषाणगाव) अशी आहेत.

महेश जयसिंगराव तुपे (वय ५६) यांचा खुन करण्यात आला होता. या प्रकरणी वरद महेश तुपे (वय १९, रा. निम्हण, विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे.

ही घटना पाषाण गावातील कोकाटे आळी येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, महेश तुपे आणि शुभम तुपे यांच्यात मालमत्तेच्या बाबतीत वाद सुरु होता. शुभम तुपे त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता, परंतु महेश तुपे यांनी पैसे देण्यास नकार दिला.

या कारणामुळे शुभम तुपे व त्याच्या दोन साथीदारांनी कट रचला. शनिवारी सकाळी दुध घेण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या महेश तुपेंवर कोकाटे आळीत तिघांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने डोक्याला, चेहऱ्याला, छातीला व गळ्याला वार करून त्यांचा निर्घुण खुन केला.

या खुनाची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे युनिट-४चे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. पोलीस हवालदार अजय गायकवाड व हरिष मोरे यांना बातमीदारामार्फत कळाले की, महेश तुपे यांच्या खुनात सहभागी असलेला ओम निम्हण विठ्ठल मंदिराच्या पाठीमागील पेरूच्या बागेच्या गेटजवळ दिसत होता.

या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांचे पथक त्वरित तिथे गेले व ओम निम्हण याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यास चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये दिले.

त्याचवेळी, चतु:श्रृंगी पोलीसांनी शुभम तुपे व रोहन सूर्यवंशी यांनाही अटक केली. ही उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ व सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, विशाल गाडे, विनोद महाजन, एकनाथ जोशी, प्रविण भालचीम, वैभव रणपिसे, रोहिणी पांढरकर व मयुरी नलावडे यांच्या कार्यक्षमतेमुळे पार पाडली गेली आहे.