93 हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त : गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मोक्का कायद्याअंतर्गत येरवडा कारागृहात बंद असलेल्या गुन्हेगाराची जामिनावर सुटका झाल्यानंतर, तो पुन्हा जबरी चोरी करण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने त्याला पकडून त्याच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हेगाराचे नाव मोहरम अली शफी शेख (वय ३२, रा. संजय गांधी मार्ग, झोपडपट्टी, मालधक्का चौक, बंडगार्डन) असून त्याच्याकडून 93 हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
मोहरम शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये 2021 मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल होता तसेच इतर 6 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार बंडगार्डन परिसरात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार ओमकार कुंभार व हनुमंत कांबळे यांना बातमी मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी मोहरम शेख याला पकडले.
चौकशी दरम्यान त्याने कबुली दिली की, जानेवारी महिन्यात लष्कर व बंडगार्डन परिसरात जबरी चोरी करून चार मोबाईल जबरदस्तीने चोरले होते. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, अमोल सरडे, उज्वल मोकाशी, संजय जाधव, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांच्या कार्यक्षमतेमुळे पार पाडली गेली आहे.
