वाहतूक पोलिसांवर प्राणघातक हल्ला : आरोपीस अटक करून धिंड काढली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फुरसुंगी येथील भेकराई नगरमध्ये सासवड रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी शिस्तभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला.
दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने त्याने वाहतूक पोलिसांवर हल्ला केला. रस्त्यावर पडलेला दगड उचलून संबंधित व्यक्तीने पोलिसाच्या डोक्यात मारला. या घटनेनंतर फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची धिंड काढत पोलिसांवर हल्ला केल्यास काय परिणाम होईल, हे दाखवून दिले.
या हल्ल्यात पोलीस हवालदार राजेश नाईक (वय ४७) गंभीर जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी भेकराईनगर चौकात ही घटना घडली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पोलिसांनी तपास करून आरोपी आदिनाथ ऊर्फ बबलू मसाळ (रा. कोलवडी, मुरकुटे वस्ती) याला उस्मानाबाद येथून अटक केली. त्यानंतर भेकराई नगर येथे त्याची धिंड काढण्यात आली. यावेळी फुरसुंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे उपस्थित होत्या.
हवालदार राजेश नाईक हे फुरसुंगी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी ते भेकराईनगर चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम पाहत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता.
नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलण्यास मनाई केली. यावरून आरोपीने वाद घालून नाईक यांना शिवीगाळ केली. अचानक रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला.
या हल्ल्यात नाईक गंभीर जखमी झाले. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर आरोपीला अटक करून पोलिसांनी त्याची धिंड काढली.
