हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेत मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मातीतील कुस्ती ही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. कुस्ती हा पारंपरिक खेळ असून, राज्यात आखाड्यांची समृद्ध परंपरा आहे. याच परंपरेतून अनेक मातब्बर पैलवान घडले आहेत. पुणे हा पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, आणि ही परंपरा पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या कुस्ती स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने पैलवानांसाठी विविध योजना सुरू केल्या असून, पुरस्कार प्राप्त मल्लांच्या मानधनात वाढ केली आहे. यामुळे अधिकाधिक मल्ल तयार होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, महाराष्ट्रातील पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पदके जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
यासाठी अधिक चांगले प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि नियोजन कसे असावे, यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, कुस्ती क्षेत्रातील अनुभवी महारथींनीही याचा विचार करून योग्य तो कार्यक्रम आखावा. त्यामुळे पुढील काळात आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व वाढेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
