सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार उघड : मुळशी तालुक्यातील भुकूम येथील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्काय आय मानस लेकसिटीमधील आयरिस-३ हाउसिंग सोसायटीत शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (एनडीए) हद्दीपासून काही मीटर अंतरावर आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी या संदर्भात बावधन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या च्या सुमारास, यादव आपल्या सोसायटीतील दोन सदस्यांसोबत लिफ्टमधून बाहेर पडत असताना त्यांना लिफ्टजवळ एक चलनी नोट दिसली.
ती उचलून पाहिल्यावर त्यावर ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ असे लिहिलेले आढळले.यादव यांनी ही नोट तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी संपूर्ण सोसायटीची पाहणी केली. मात्र, सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग होत नसल्याने कोणत्या व्यक्तीने ती नोट ठेवली असावी, याबाबत कोणतेही फुटेज उपलब्ध झाले नाही.
एनडीएसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने हा प्रकार अधिक संशयास्पद ठरत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या नोटेचा उद्देश काय होता आणि ती तिथे कशी आली, याचा शोध घेतला जात आहे.
