भैरोबानाला येथील थरारक प्रकार : कारचालकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर त्याने बाहेर येण्यास सांगून कारचा फोटो घेत असताना कारचालकाने त्याला धडक दिली. तो कारच्या बोनेटवर पडला असताना त्याला तसेच फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर कारचालकाने ५०० मीटर दुर गाडी थांबविल्यावर दुचाकीस्वाराची सुटका झाली. वानवडी पोलिसांनी कारचालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत अभिजित गोलाईत (वय ३०, रा. हेवन पार्क, आझादनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. राजीव बर्मन (वय ६०, रा. सॅकर्ट हर्ट टाऊन, वानवडी) असे अटक केलेल्या कारचालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरुन घरी जात असताना पाठीमागून आलेल्या मारुती ईरटीका कारने त्यांना मागून धडक दिली. त्यात दुचाकीचे फुटरेसचे नुकसान झाले. यावेळी फिर्यादी यांनी कारच्या पुढे उभे राहून चालकाला बाहेर ये म्हणत कारचा फोटो घेत होते. तेव्हा कारचालकाने कार जोरात पुढे आणली.
त्यामुळे तिची धडक फिर्यादी यांना बसली व ते कारच्या बोनेटवर आपटले. कारचालकाने त्याच स्थितीत कार पुढे नेण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आजू बाजूचे लोक आरडा ओरडा करु लागले. तरी कारचालक न थांबता तसाच पुढे जात होता. जवळपास ५०० मीटर कार पुढे नेल्यानंतर त्याने कार थांबविली. तेव्हा फिर्यादीची सुटका झाली.
वानवडी पोलिसांनी कारचालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून राजीव बर्मन याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.
