इंडेक्स ट्रेडर्सच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुंतवणुकीवर १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारल्यानंतर इंडेक्स ट्रेडर्स कंपनीच्या संचालकांनी कार्यालय बंद करून पलायन केले. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आनंद आबनावे (वय ३५, रा. गंगासमृद्धी, फातिमानगर, वानवडी) आणि अमित पायगुडे (वय ३६, रा. पायगुडे वाडा, सिंहगड रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी थेरगाव येथील ५१ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आबनावे आणि अमित पायगुडे यांनी धनकवडीतील के. के. मार्केट येथे इंडेक्स ट्रेडर्स या नावाने ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय सुरू केले. त्यांनी गुंतवणूकदारांना १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून आरटीजीएसद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारले.
फिर्यादी महिलेने ६ लाख रुपये गुंतवले, तर इतर गुंतवणूकदारांनी मिळून एकूण ३० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. ६ महिने हे कार्यालय सुरळीत सुरू होते. मात्र, १३ मे २०२४ रोजी अचानक कार्यालय बंद करण्यात आले आणि दोन्ही संचालक फरार झाले.
गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही दिवस आरोपींनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर त्यांनी फोन बंद केले. शेवटी गुंतवणूकदार एकत्र येऊन त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
सध्या पोलिसांकडे सहा तक्रारी दाखल असून, आतापर्यंत ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे करीत आहेत.
