बनावट उत्पादन विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई : ३ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हिरो कंपनीच्या (HERO) ल्युब्रिकंट इंजिन ऑईलचे एच हेरो (H Herro) या नावाने बनावट उत्पादन तयार करून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, ३ लाख ११ हजार ४१५ रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे.
ताहेर पुनावाला (वय २०, रा. बादशहा नगर, कोनार्कपूरम सोसायटी समोर, कोंढवा) आणि जावेद खान (रा. टिंगरेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. जावेद खान याने मोठ्या प्रमाणावर हे बनावट इंजिन ऑईल विकल्याचा संशय आहे.
हिरो कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी सचिन शर्मा (रा. फरीदाबाद, हरियाणा) यांनी काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ५ पथकाने हडपसर येथील युनीक अॅटोमोबाईल्स अँड स्पेअर पार्ट्स या दुकानावर छापा टाकला.
ताहेर पुनावालाच्या दुकानातून १ लाख १० हजार १६० रुपयांचे ३०६ नग बनावट इंजिन ऑईल जप्त करण्यात आले. चौकशीत ताहेर पुनावालाने हा माल वाघोली येथून घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी एस एफ इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या फर्मवर छापा टाकला.
तेथे ४७२ बाटल्या (९०० मिली), ५६० बनावट लोगो, १२७५ रिकाम्या बाटल्या आणि १०० रिकामे पॅकिंग बॉक्स असा २ लाख १ हजार २५५ रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला.
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सहाय्यक फौजदार राजस शेख, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, सचीन मेमाणे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, राहुल ढमढेरे तसेच युनिट ६ कडील कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, सचिन पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
