‘कॉप 24’ उपक्रम राबवला जाणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.
शहर पोलिसांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले असून, सहभागी पोलिसांसाठी विशिष्ट ड्रेस कोड, वाहने आणि प्रशिक्षण निश्चित करण्यात आले आहे. आता महिलांना मदतीचा हात देण्यासाठी ‘महिला बीट मार्शल’ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर कोणी तरुणी किंवा महिला अडचणीत असताना ११२ क्रमांकावर कॉल केला, तर घटनास्थळी महिला बीट मार्शल पाठवण्याचे नियोजन केले आहे. ‘कॉप-२४’ अंतर्गत २४ तास बीट मार्शल शहरात गस्त घालणार आहेत.
हा उपक्रम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. यासाठी ७२६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यामध्ये ५२६ पुरुष आणि २०० महिला कर्मचारी असतील.
या टीमसाठी स्वतंत्र ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. त्यांना १२३ दुचाकी आणि ३९ सीआर मोबाईल व्हॅन (कार) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली बसवण्यात आली असून, त्याद्वारे बीट मार्शलच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले जाणार आहे, त्यामुळे कामात हलगर्जीपणा होणार नाही.
याशिवाय, ‘कॉप-२४’ मध्ये सहभागी बीट मार्शलच्या गणवेशावर निळ्या रंगाची वर्दी आणि बॉडी कॅमेरा असेल. त्यामुळे घटनास्थळी पोहोचल्यानंतर घडणाऱ्या सर्व घडामोडींचे रेकॉर्डिंग होईल.
यामुळे पोलिसांवर खोटे आरोप होण्याची शक्यता कमी होईल, तसेच कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असल्यास त्याचा पुरावाही उपलब्ध होऊ शकेल. ‘कॉप-२४’ उपक्रमामुळे शहरात पोलिसांची उपस्थिती वाढेल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
