३१ मार्चपर्यंत मुदत : अन्यथा कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांसाठीही बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली असून, वाहनधारकांनी ही नंबर प्लेट लवकरात लवकर बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट देणे बंधनकारक करण्यात आले होते. नव्या वाहनांसोबत या प्लेट्स उपलब्ध होतात.
या प्लेट्स वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आल्या असून, त्यावर होलोग्राम स्टिकर आणि प्रेशर मशिनद्वारे कोरलेला इंजिन व चेसिस क्रमांक असतो. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटल्यास पुन्हा जोडता येत नाही, तसेच तिची बनावट प्रत तयार करणे अशक्य आहे.
त्यामुळे वाहन चोरीला गेल्यास किंवा अपघात झाल्यास या नंबर प्लेटद्वारे मालकासह सर्व माहिती मिळू शकते. एप्रिल २०१९ नंतर बाजारात आलेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आधीपासूनच बंधनकारक आहे.
मात्र, आता २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांनाही ती बसवावी लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली असून, नागरिक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे किंवा अधिकृत केंद्रांवर जाऊन ही नंबर प्लेट बसवू शकतात.
३१ मार्चनंतर नंबर प्लेट बसवलेली नसल्यास संबंधित विभाग कारवाई करणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या निर्णयाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांना पुरेसा कालावधी मिळेल आणि भविष्यातील कारवाई टाळता येईल.

















