आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा बदलली

Spread the love

पुणे : पुणे तीथे काय उणे! प्रशासनाच्या निर्णयापुढे नागरिकांची गरज गौण ठरत असल्याचे बिबवेवाडीतील गंगाधाम चौकात पाहायला मिळत आहे. मृत्यूचा सापळा ठरलेला मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर रस्ता वाहतूक कोंडी आणि अपघातमुक्त करण्यासाठी उड्डाणपुल महत्त्वाचा होता. मात्र, हा उड्डाणपुल आता बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर हा रस्ता थेट कात्रज-कोंढवा मार्गाला जोडतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती, गोदामे, मंगल कार्यालये, शाळा आणि दवाखाने आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी या मार्गावर उड्डाणपुल आवश्यक होता.

मात्र, काही बांधकाम व्यावसायिकांना फायदा होईल या हेतूने उड्डाणपुलाची दिशा बदलण्यात आल्याचा आरोप होत आहे. हा उड्डाणपुल आता बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर उभारला जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून उड्डाणपुलाची मूळ गरज ओळखावी आणि त्याची दिशा योग्य ठिकाणी बदलावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.