मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : ५ मोठे, १२ छोटे गॅस सिलेंडर जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत एका छोट्या खोलीत बेकायदेशीररित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून खासगी छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रक्रिया अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू होती.
या प्रकरणी पोलीस हवालदार राजेश थोरात यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, बंदेनवाज ऊर्फ सलीम शेरीकर (वय ३५, रा. गल्ली नं. ४, आंबेडकरनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दावल एंटरप्रायझेस या दुकानातील एका खोलीतून ५ मोठे आणि १२ छोटे गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. मार्केटयार्ड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की आंबेडकरनगरमधील गल्ली क्रमांक ४ येथे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे, चेतन मोरे व त्यांच्या पथकाने दावल एंटरप्रायझेस या दुकानावर कारवाई केली.
त्यांना मोठ्या गॅस सिलेंडरमधून निष्काळजीपणे लहान सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त केले आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत. तीन वर्षांपूर्वी कात्रज येथील अंजलीनगरमधील एका गोदामात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू होते.
त्यावेळी गॅस गळतीमुळे भीषण आग लागली होती आणि २२ गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. यापूर्वीही पुणे शहरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून, काही पैशांसाठी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

















