खोट्या पावत्या : बनावट बिले तयार करून शोरूम मालकाची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकी शोरूममध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्या महिलेने रोख, ऑनलाइन रक्कम, ग्राहकांची शॉर्ट रक्कम, अॅक्सेसरीज व इतर साहित्य यामध्ये खोट्या पावत्या आणि खोटे अहवाल तयार करून तब्बल १२ लाख ९४ हजार ९२४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी जिगर गवळी (वय ३८, रा. राजतारा कॉम्प्लेक्स, मांजरी) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार किर्ती विशाल गोडसे (रा. मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत शेवालवाडी येथील प्लॅटिनम अॅटो शोरूममध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शोरूममध्ये किर्ती गोडसे या कॅशियर पदावर कार्यरत होत्या. त्यांची जबाबदारी ग्राहकांकडून रोख, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पेमेंटद्वारे रक्कम स्वीकारणे, पावती देणे, ग्राहकांशी संवाद साधून वाहन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणे, मालमत्ता व वाहन उपकरणांचा तपशील ठेवणे, अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करणे आणि कंपनीच्या लेखापाल विभागाकडे रोजच्या व्यवहाराचा तपशील सुपूर्त करणे अशी होती.
शोरूममधील ग्राहकांच्या येणाऱ्या रकमेतील तफावत लक्षात आल्यानंतर फिर्यादी गवळी यांनी जनरल मॅनेजर आणि इतर अधिकाऱ्यांकडून शोरूमचे ऑडिट करून घेतले. त्यात किर्ती गोडसे यांनी रोख व ऑनलाइन व्यवहारांमध्ये हेराफेरी करून, बनावट पावत्या आणि खोटे अहवाल तयार करून तब्बल १२ लाख ९४ हजार ९२४ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले.
गोडसे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितल्यावर त्यांनी शोरूमच्या अधिकृत मेलवर आत्महत्येची धमकी देणारा मेल पाठवला. तसेच, पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. गेल्या २ ते ३ महिन्यांपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर फिर्यादींनी पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करीत आहेत.
