१८.६९ लाख रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य हस्तगत : विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: विश्रांतवाडी पोलिसांनी इलेक्ट्रिक साहित्याने भरलेला टेम्पो चोरी करणाऱ्या आरोपीला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. या कारवाईत एकूण १८,६९,४१७ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी विजय विठोबा भिकुले (वय ५४, रा. आदर्श कॉलनी, टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे विपुल शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाई-टेक कॉर्पोरेशन या दुकानात वाहनचालक म्हणून काम करत होते.
२९ जानेवारी रोजी, त्यांनी पिंपरी-चिंचवड भागातील ऑर्डर पुरवण्यासाठी टेम्पोमध्ये माल भरला आणि घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी माल पोहोच करायचा होता. त्यांनी टेम्पो घराजवळ पार्क केला होता, मात्र ३० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता गाडी गायब असल्याचे आढळले. दोन दिवस शोध घेतल्यानंतर, १ फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि तपास पथकाच्या अंमलदारांना गुप्त माहिती मिळाली की, प्रशांत दिगंबर पाटील (रा. औरंगाबाद) याने हा गुन्हा केला आहे. तसेच, चोरी केलेला माल तो विक्रीसाठी भरूच, गुजरात येथे घेऊन गेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, विश्रांतवाडी पोलिसांचे तपास पथक तातडीने गुजरातला रवाना झाले.
भरूच येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून महिंद्रा पिकअप (किंमत २.५० लाख रुपये) आणि त्यामधील १६.१९ लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण १८.६९ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) हिंमत जाधव, तसेच सहायक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, तसेच पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विश्रांतवाडी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे महत्त्वाचा चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला न्यायालयीन कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे.
