आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आर्मीत भरतीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणारा जेरबंद

Spread the love

पुणे : पुण्यात शासकीय परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना हेरून त्यांना आर्मीत भरती करतो, असे आमिष दाखवून लाखो रुपये हडप करणाऱ्या कमांड हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगाराला मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे.

मोहित रामसिंग धामी (वय ३२, रा. उत्तराखंड) असे या भामट्याचे नाव आहे. मोहित धामी हा पुण्यातील कमांड हॉस्पिटल येथील कॅन्टीनमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काही काळ काम करत होता. त्यामुळे त्याला आर्मी भरतीबाबत माहिती होती. या माहितीचा गैरफायदा घेत तो बाहेरगावाहून परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना फसवत असे.

याबाबत धुळ्यातील एका २३ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार ३१ मार्च २०२४ पासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेसाठी पुण्यात आले होते. ३१ मार्च २०२४ रोजी परीक्षा संपल्यानंतर ते पुणे रेल्वे स्टेशनवर धुळ्याला जाण्यासाठी पोहोचले. त्यावेळी रात्री ८ वाजता त्यांची भेट मोहित धामी याच्याशी झाली.

त्याने स्वतःला आर्मीतील कर्मचारी आणि सध्या कमांड हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असल्याचे सांगितले. गप्पांदरम्यान, त्याने “मी तुम्हाला आर्मीमध्ये भरती करून देऊ शकतो” असे आमिष दाखवले. फिर्यादींनी “आमचे वय जास्त झाले आहे” असे सांगितले असता, “तुमचे वय जास्त असले तरी मी तुमचे काम करून देतो” असे तो म्हणाला.

यानंतर, त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. ३ एप्रिल २०२४ रोजी मोहित धामीने फोन करून कागदपत्रे मागवून घेतली. त्यानंतर त्याने एक QR कोड पाठवला आणि त्यावर ५ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर केले.

यानंतर, तो वेगवेगळी कारणे सांगत अजून पैसे मागत राहिला. फिर्यादीने २ लाख ८० हजार रुपये, तर त्यांच्या मित्राने २ लाख रुपये, असे मिळून ४ लाख ८० हजार रुपये त्याला पाठवले.

पैसे मिळाल्यानंतर मोहित धामीने त्यांचा फोन घेणे टाळले. फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला संशय आल्याने ते गेल्या महिन्याच्या अखेरीस पुण्यात परत आले आणि कमांड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. तेव्हा असा कोणी मोहित धामी तेथे काम करत नसल्याचे समजले. त्यांनी आपली फसवणूक झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाला दिली.

आर्मी इंटेलिजन्स युनिटने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राकडून सर्व माहिती घेतली. तपासादरम्यान, मोहित धामीने आणखी एका व्यक्तीची फसवणूक केल्याचे उघड झाले. आर्मी इंटेलिजन्सचे अधिकारी मोहित धामीचा शोध घेत असताना, मंगळवारी तो पुन्हा पुणे रेल्वे स्टेशन येथे आढळून आला.

त्यानंतर आर्मी इंटेलिजन्सच्या पथकाने त्याला अटक केली आणि चौकशीअंती बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले. बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते पुढील तपास करत आहेत.