पैसे मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी : जयपूरच्या कॉलेजमधील मित्रानेच फसवणूक केली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जयपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या एका डॉक्टराने ओळखीचा फायदा घेत प्रसिद्ध डॉक्टर आणि त्यांच्या मित्राला डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १ कोटी ७१ लाख १८ हजार १५९ रुपयांचा गंडा घातला. पैसे परत मागितल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे, आरोपी मोहित नागर याच्यावर जयपूर येथे खंडणी आणि बलात्काराचे गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी बाणेर येथील ५४ वर्षीय डॉक्टरने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार मोहित मुकेश नागर (वय ४१, रा. इंदिरा कॉलनी, बनी पार्क, जयपूर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉक्टर प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक असून, ते आयव्ही स्किन क्लिनिकचे संस्थापक आहेत. त्यांच्या नावावर ६ विविध प्रकारची पेटंट्स नोंदणीकृत आहेत. २०१९ मध्ये जयपूर येथे एका मित्रामार्फत त्यांची ओळख डॉ. मोहित नागर याच्याशी झाली.
फिर्यादींचे मूळ गाव जयपूर असल्याने ते वारंवार तेथे जात असत. मोहित नागर याने एसएमएस मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाल्याचे सांगितल्याने त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाले. मोहित नागर अनेकदा पुण्यात येत असे. नागर कुटुंबाला वैद्यकीय मदतीची गरज भासल्यावर फिर्यादींनी मैत्रीच्या नात्याने त्याला मदत केली.
२०२१-२२ मध्ये मोहित नागर याने त्वचेच्या समस्यांसाठी उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २०२२ ते २०२४ दरम्यान फिर्यादी डॉक्टरांनी त्याच्यावर विविध त्वचारोग उपचार केले. उपचार शुल्क सर्व उपचार झाल्यानंतर देतो, असे नागर याने सांगितले होते.
दरम्यान, नागर याने फिर्यादींना डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. ऑगस्ट २०२२ मध्ये फिर्यादींनी १० लाख रुपये गुंतवले. काही दिवसांनी ही रक्कम २० लाख झाली आणि नंतर २५ लाख झाल्याचे सांगून नागर याने अधिक गुंतवणुकीसाठी त्यांना प्रोत्साहित केले.
यानंतर फिर्यादींनी आपल्या मित्राला, जोसेफ याला, या गुंतवणुकीबाबत सांगितले. जोसेफ यांनीही मोहित नागरच्या सांगण्यावरून १ सप्टेंबर २०२४ पासून १ कोटी ४९ लाख ९ हजार १५९ रुपये गुंतवले. मोहित नागर याच्या उपचारानंतर फिर्यादींनी त्याला २ लाख रुपयांचे बिल दिले आणि पैसे मागितले.
त्यावेळी त्याने पैसे डिजिटल करन्सीमध्ये गुंतवल्याचे सांगत परतावा देण्याचे आश्वासन दिले. मात्र, वेळ जात असताना नागर याने टाळाटाळ सुरू केली. वारंवार पैशांसाठी विचारणा केल्यानंतर त्याने फिर्यादींना “तुझे आणि तुझ्या मित्राचे पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर” असे सांगून शिवीगाळ केली. तसेच, “डॉ. अखिलची काय हालत केली आहे, ते तुला माहीत आहे.
तुझीही तशीच हालत करीन,” अशी धमकी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन करांडे करत आहेत.
