आरटीओ चा वाहनचालकांसह विक्रेत्यांना इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ च्या पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सेक्युरिटी नंबर प्लेटफ् बसविणे अनिवार्य केले आहे. त्याचा गेरफायदा घेऊन काही विक्रेते बनावट नंबर प्लेट कमी किंमतीत वाहनांना बसवीत आहेत. अशा नंबर प्लेटवर पिन क्रमांक नसतो. शिवाय त्यांची नोंद आरटीओच्या वाहन प्रणाली येथे नसते. त्यामुळे अशी नंबर प्लेट बेकायदा ठरते. अशी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर आरटीओ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणार आहे.
त्याचबरोबर अशी नंबर प्लेट बसवून देणार्या संबंधित विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई करणार असल्याचा आरटीओने इशारा दिला आहे. परिवहन विभागाने राज्यातील सर्वच वाहनांना आता उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वाहनचालक अशी नंबर प्लेट बसविण्यासाठी धावपळ करु लागले आहेत.
त्याचा गैरफायदा घेत काही विक्रेते कमी किंमतीत बनावट हाय सेक्युरिटी नंबर प्लेट असल्याचे भासवीत वाहनाचालकांची फसवणूक करत आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या वाहनांसाठी पुण्यात ६९ केंद्र स्थापन केले असून तेथे नंबरप्लेट बदलण्याचे काम सुरु झाले आहे.
अधिकृत नसलेल्या विक्रेत्यांकडे नंबर प्लेट बसवून घेऊ नका, असे आवाहन आरटीओ ने केले आहे़. हाय सेक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहन चोरी गेले, त्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्याचा शोध घेणे सोयीस्कर होणार आहे.
