आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

राज्यात कोठूनही ऑनलाइन भाडेकरार नोंदविता येणार

Spread the love

पुणे : राज्यभरात आता कुठूनही ऑनलाइन भाडेकरार नोंदविता येणार आहे. यासाठी भाडेकरार २.० ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पक्षकारांची माहिती आधार क्रमांकद्वारे थेट आधार पोर्टलवरुन घेण्यात येणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. येत्या पंधरवड्यात ही प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.

सध्या ऑनलाइन भाडेकरारासाठी भाडेकरार १.९ ही संगणक प्रणाली वापरली जात आहे. गेल्या वर्षभरात राज्या १३ लाख १० हजारांहून अधिक भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आले. पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर या विभागात भाडेकरारांची विक्रमी दस्त नोंदणी होत असते. त्यामुळे १.९ या संगणक प्रणालीतील काही त्रुटी दूर करुन २.० ही अद्ययावत संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे.

ही प्रणाली १७ फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचा प्रत्यक्ष वापर सुरु झाल्यानंतर जाणवणार्या त्रुटी लक्षात घेऊन येत्या १५ दिवसात ही प्रणाली संपूर्ण राज्यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे राज्यात एका ठिकाणाहून अन्य जिल्ह्यात भाडेकरार ऑनलाइन करता येणार आहे.

भाडेकरार आता मराठीत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच भाडेकरारासाठीचे शुल्क भरण्यासाठी याच पोर्टलवरुन क्युआर कोडचा वापर करुन पे टे आयजीआर या प्रणालीचा वापर करता येणार आहे. पक्षकाराचे आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याची संबंध माहिती आधार पोर्टलवरुनच मिळविली जाणार आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळता येणार आहे.