गहाण ठेवलेली कागदपत्रे परत न दिल्याने हडपसरमध्ये धक्कादायक घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दीड लाख रुपये दिल्यानंतर गहाण ठेवलेली जमिनीची कागदपत्रे परत देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने महिलेच्या डोक्यात चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तिच्या बहिणीवरही चाकूने वार करण्यात आला. हा प्रकार पुण्यातील हडपसर येथे घडला.
याप्रकरणी सत्यभामा फुलचंद सास्तुरे (वय ३०, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दत्तात्रय भोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शेवाळवाडी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्यभामा सास्तुरे आणि आरोपी दत्तात्रय भोरे यांची एक वर्षापूर्वी ओळख झाली होती.
दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दत्तात्रय भोरे आर्थिक अडचणीत असल्याने सत्यभामा यांनी दहा महिन्यांपूर्वी त्याला दीड लाख रुपये हात उसने दिले होते.
त्याच्या बदल्यात त्यांनी भोरे याची कुंजीरवाडी येथील दोन गुंठे जमिनीची कागदपत्रे स्वतःकडे ठेवली होती. मात्र, भोरे पैसे परत करत नसल्याने त्यांच्यात वाद सुरू होता.
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भोरे हे सत्यभामा यांच्या घरी गेले आणि त्यांनी जमिनीची कागदपत्रे मागितली. त्यावेळी सत्यभामा यांनी पैसे दिल्याशिवाय कागदपत्रे परत न करण्याचा निर्णय सांगितला.
यावर भोरे यांनी शिवीगाळ करत सत्यभामा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
सत्यभामा यांना वाचवण्यासाठी त्यांची बहिण गोदावरी पुढे आली.
तिने भोरे याला दूर सारण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या भोरेने खिशातून चाकू काढून सत्यभामा यांच्या डोक्यात वार केला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
रक्ताच्या थारोळ्यात त्या खाली पडताच गोदावरीने मदतीसाठी जोरात आरडाओरड केली.
यामुळे आरोपीने तिलाही लक्ष्य करत तिच्या डोळ्याखाली चाकूने वार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले करत आहेत.
