आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चापट मारल्याच्या रागातून कंटेनर अंगावर घालून हत्या

Spread the love

पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे एका वेअरहाऊससमोर धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने चापट मारल्याचा राग मनात धरून कंटेनर अंगावर घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

या प्रकरणी रामचंद्र शिवराम पोले (वय ४४) या कंटेनर चालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी राम दत्ता पुरी (वय २५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात परमेश्वर देवराये याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम पुरी आणि मृत परमेश्वर देवराये यांच्यात हॉटेलमध्ये बिल देण्यावरून वाद झाला. या वादात परमेश्वरने राम पुरी याला चापट मारली. याचा राग धरून आरोपीने आपल्या ताब्यातील (MH-12 WX-8307) क्रमांकाच्या कंटेनरला चालू केले आणि परमेश्वरच्या दिशेने भरधाव वेगाने धावून त्याला जोरदार धडक दिली.

इतकेच नव्हे, तर त्याच्या अंगावर कंटेनर घालून त्याला ठार केले.

या घटनेनंतर वाघोली पोलीस ठाण्यात आरोपी राम दत्ता पुरी याच्या विरोधात हत्या सदृश गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली असल्याची माहिती वाघोली पोलिसांनी दिली आहे.